मुंबई: मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय संपादन केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपवर ४० टक्के कमिशनचा आरोप काँग्रेसकडून लावण्यात आला व निवडणुकीत तशा पद्धतीची रणनीती प्रचारादरम्यान आखली गेली. त्याचा पुरेपूर फायदा हा काँग्रेसला झाला व कर्नाटकमधील भाजपचे सरकार खाली खेचण्यात काँग्रेस यशस्वी ठरले. आता मध्य प्रदेशमध्ये अशाच पद्धतीने शिवराज सिंह चौहान भाजपच्या सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप लावण्यात आला आहे. तशा पद्धतीचे ट्विट काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांच्याकडून करण्यात आले होते. या कारणास्तव प्रियंका गांधी त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मंत्री अरुण यादव यांच्यावर एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला आहे. परंतु यासर्व घटनांचे पडसाद येणाऱ्या दिवसांत इतर राज्यातही दिसून येणार आहेत.
योग्य वेळी योग्य पुरावे सादर होतील : कमिशनच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी सांगितले आहे की, कर्नाटकमध्ये भाजपवर ४० टक्के कमिशनचा आरोप लावण्यात आला. त्यात तथ्य होते म्हणूनच जनतेने भाजप सरकारला नाकारले. काँग्रेसने तेथे दणदणीत विजय संपादन केला. अशाच पद्धतीने मध्यप्रदेश मध्ये सुद्धा भाजपवर ५० टक्के कमिशनचा आरोप लागला आहे. तेथेही काँग्रेसचेच सरकार येणार असा दृढ विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करण्यात माहीर आहे. पण कमिशनच्या मुद्द्यावर जनता त्रस्त आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेतले जात आहे. महाराष्ट्रातील अगोदर शिंदे - फडणवीस व आता अजित पवार यांचे सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, हे जनता खुल्या डोळ्याने बघत आहे. सरकारच्या विविध योजना असतील, पोलिसांच्या बदल्या असतील, नोकर भरती असेल सर्वच बाबतीत कमिशन शिवाय काम होत नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे.