मुंबई :नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये झालेल्या नुकत्याच नाराजी नाट्यामध्ये काँग्रेसने सत्यजित यांना तिकीट द्यायला हवे होते, असे मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. आघाडीच्या वतीने सत्यजित यांनी निवडणूक लढवली असती तर चित्र आणखीन चांगले झाले असते, असे मत विरोधी पक्ष नेते पवार यांनी व्यक्त केले आहे.
पवारांचा खर्गेना फोन :सत्यजित तांबे यांना तिकीट मिळावे, यासाठी सर्वजण प्रयत्न करीत होते. महाविकास आघाडीचा नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन केला होता अशी माहिती अजित पवार यांनी दिली. मात्र, सत्यजित यांना थेट उमेदवारी न दिली गेल्याने आज अडचण झाली आहे. मात्र, काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांना सामावून घ्यायला पाहिजे, असे मतही पवार यांनी व्यक्त केले होते. तसेच सत्यजित तांबे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मदत केल्याचेही जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले.
पवारांनी आघाडीचा धर्म पाळला नाही : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांचे निलंबन केले होते. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांना सर्वांनी मदत करणे अपेक्षित होते. त्यांना सर्वांनी योग्य मदत केली असती तर त्या निवडून आल्या असत्या. मात्र अजित पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांना मदत केली नाही. म्हणजेच त्यांनी आघाडीचा धर्म पाळलेला नाही. आघाडीचा विरोधातील उमेदवाराला मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीने आता यापुढे आपल्याकडून आघाडीचा धर्म पाळण्याची अपेक्षा बाळगू नये, असा इशाराही यावेळी नाना पटोले यांनी दिला आहे.