मुंबई - मागील दोन दिवसापासून काँग्रेसच्या आमदारांना जयपूर येथे मुक्कामास ठेवण्यात आले आहे. या आमदारांच्या भेटीसाठी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते जयपूरसाठी रवाना झाले आहेत. काँग्रेसची महत्त्वाची बैठक उद्या या आमदारांसोबत होणार आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा, की सत्तेत सहभागी व्हायचे? यासाठीचा निर्णय काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-अयोध्येचा निकाल एका पक्षाचा जय नसून संविधानाचा विजय - माजी न्यायमूर्ती सावंत
आज (शनिवारी) दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली आहे. या बैठकीत काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्यासाठी आमदारांचे मत अजमावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते जयपूरकडे रवाना झाले आहेत. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, यांचा समावेश आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सकाळी लवकर जयपूरला पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काँग्रेसच्या आमदारांना जयपूर येथील विस्ता रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहे. यांच्या देखरेखीसाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह इतर अनेक नेते सोबत आहेत. राजस्थानमधील अनेक काँग्रेसच्या नेत्यांचा यासाठी कडा पहारा ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात येते आहे. जयपूर येथे काँग्रेसच्या आमदारांसोबत राज्य प्रभारी मल्लीकार्जून खरगे ठाण मांडून बसले आहेत. तर उद्या (रविवारी) केंद्रीय निरीक्षक म्हणून काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते दिल्लीहून जयपूरला सकाळी पोहोचणार आहेत. हे नेते राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यात त्रिशंकू परिस्थितीमध्ये काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे की नाही यावर आमदारांचे आणि नेत्यांचे मत विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसची भूमिका निश्चित केली जाणार आहे. याच बैठकीमध्ये काँग्रेसचा विधिमंडळ नेताही ठरवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.