महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Alleged on Adani : अंधेरीतील ५००० कोटी रुपयांची कामगार हॉस्पिटलची जागा ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव, काँग्रेसच्या या नेत्याचा मोठा आरोप - राजेश शर्मा आरोप

मुंबईतील अंधेरी येथील कामगार हॉस्पिटल (Andheri Kamgar Hospital) अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राजेश शर्मा (Congress Leader Rajesh Sharma Alleged on Adani ) यांनी केला आहे. एक महिन्याच्या आत हॉस्पीटल सुरु केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत ४५ लाख कामगारांच्या आरोग्याशी खेळ करून अदानीचे घर भरू नका, असा आरोप शर्मा यांनी केला आहे.

Rajesh Sharma
राजेश शर्मा

By

Published : Jan 9, 2023, 8:31 PM IST

मुंबई : अंधेरीतील कामगार हॉस्पिटल (Andheri Kamgar Hospital) गेल्या चार वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. आतापर्यंत २५० कोटी रुपये दुरुस्तीसाठी व ५० कोटी रुपये वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी देण्यात आले असून कामगार विमा महामंडळ हे ह़ॉस्पिटल पुन्हा सुरु करण्यास इच्छुक नसल्याचा आरोप शर्मा (Congress Leader Rajesh Sharma Alleged ) यांनी केला.

अदानींना देण्याचा सरकारचा डाव : अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलची पाच हजार कोटी रुपये किमतीची जवळपास १२ एकर जमीन अदानी या उद्योगपतीच्या घशात घालण्याचे षडयंत्र असल्यानेच हे हॉस्पिटल सुरु केले जात नाही, असा गंभीर आरोप करून एक महिन्याच्या आत सरकारने हे हॉस्पीटल सुरु केले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा (Rajesh Sharma) यांनी दिला आहे.

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल : अंधेरीमध्ये १९७७ साली या कामगार हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली व २००८ सालापर्यंत हे हॉस्पिटल राज्य सरकारच्या अधिपत्याखाली चालत होते. त्यानंतर हे हॉस्पिटल ESI कार्पोरेशनने १४ एप्रिल २००८ रोजी त्यांच्याकडे वर्ग करुन घेतले. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने या हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करुन ५०० बेडसचे हॉस्पिटल केले व मेडीकल कॉलेजही सुरु केले. या रुग्णालयात १७ डिसेंबर २०१८ रोजी आगीची दुर्घटना घडली व त्यात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. ही दुर्घटना होण्याआधी या रुग्णालयात ओपीडी 350 घाटांचे आयपीडी आणि आयसीयू, सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातून कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. मोठ-मोठ्या शस्त्रक्रियाही मोफत केल्या जात होत्या.

तीव्र आंदोलनाचा इशारा : महाराष्ट्रातील ४५ लाख कामगार विमा योजनेचे सदस्य आहेत. कामगारांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळव्यात या हेतूने देशभर कामगार हॉस्पिटल्सही उभारण्यात आली. अंधेरीतील कामगार ह़ॉस्पिटल हे यातील एक महत्वाचे व सर्व सुविधांनीयुक्त असे हॉस्पिटल होते पण मागील चार वर्षांपासून हे हॉस्पिटल बंद असल्याने कामगारांना हालअपेष्टा सहन करत कांदीवलीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागते. हॉस्पिटल सुरु होत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हॉस्पिटलमधील २५० डॉक्टर व ५०० जणांचा वैद्यकीय स्टाफ इतरत्र वर्ग करण्यात आला. अंधेरीतील कामगार हॉस्पिटल बंद करून लाखो कामगारांच्या आरोग्याशी खेळून ही जागा उद्योगपतीच्या घशात घातली जात आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे याप्रश्नी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. पण त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. केंद्र सरकार बरोबरच महाराष्ट्र सरकारनेही यात लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करावी व याच जागेवर कामगार ह़ॉस्पिटल पुन्हा सुरु करावे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, सरकारने यावर तातडीने निर्णय करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असेही राजेश शर्मा म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details