मुंबई- देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आम्ही इंग्रजाच्या विरोधात लढाई लढली होती. आता हीच लढाई भाजपच्या विरोधात लढायची आहे. भाजपाने दहशतवादाचे आरोप असलेल्या प्रज्ञासिंह साध्वीला उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी केलेले विधान हे देशाचाच नाही तर मुंबईकरांचाही मोठा अपमान असल्याचे उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांनी म्हटले आहे.
साध्वीच्या या विधानाचा निषेध हा मुंबईकरांनी मतदानातून व्यक्त करावा आणि भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी मतदारांना केले आहे. कुर्ला पश्चिमेला असलेल्या मुस्लिम बहुल एलआयजी परिसरात प्रिया दत्त यांची प्रचार सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या. या प्रचार सभेला काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांसह माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही उपस्थित होते.
साध्वीच्या वक्तव्यावर प्रिया दत्त यांची प्रतिक्रिया भाजपने अशा व्यक्तीला तिकीट देऊन आपला खरा चेहरा लोकांसमोर आणला आहे. त्यामुळे आता लोकांनी त्यांना त्यांची खरी जागा दाखविण्याची गरज आहे. ही निवडणूक देशाचे आणि तुमच्या मुलांचे ही भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे भाजपच्या कुटील राजनीतीला उखडून टाकण्यासाठी मुंबईकरांनी समोर यावे आणि आपली ताकद ही मतदानातून दाखवून द्यावी, असे आवाहन करत भाजपने अशा व्यक्तीची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी दत्त यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात जे जे निर्णय घेतले त्या निर्णयातून देशातील गरीब माणूस सर्वाधिक मारला गेला. त्याची आर्थिक नाकेबंदी झाली आणि तो प्रचंड कोंडीत सापडला. त्याचप्रमाणे मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली, ५० लाखाहून अधिक नोकऱ्या गेल्या. त्यामुळे देशात नोकरी आणि रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न मोदींच्या कार्यकाळात उभा राहिला आहे. मोदींनी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा केली होती, परंतु नोटबंदीनंतर त्यांनीच देशात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप दत्त यांनी केला.