मुंबई - देशात ज्या ठिकाणी भाजपाचे राज्य आहे त्या ठिकाणी महिला आणि दलितांवर अत्याचार होत असून त्याविरोधात आम्ही हे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आणि हक्कांची जाणीव करून देणार आहोत, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. दादर चैत्यभूमी येथे आज काँग्रेसकडून भाजपशासित राज्यात होत असलेल्या दलित आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे मंत्री, माजी आमदार, माजी खासदार तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाच्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही हे आंदोलन येथे केले आहे. संपूर्ण देशामध्ये काँग्रेस हे आंदोलन करत असल्याचे थोरात यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समतेचा संदेश दिला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संविधान बनले. त्यांच्या पवित्र अशा चैत्यभूमी या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. ही समतेची आणि न्यायाची भूमी आहे. यामुळे आम्ही या भूमीतून सगळ्या समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याची यातून प्रयत्न करणार असल्याचे थोरात म्हणाले.