मुंबई: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एसटीच्या संपाबाबत बोलताना राज्यात एसटी बंद असल्यामुळे राज्यातील जनतेचे हाल होत आहेत. या प्रकरणात तोडगा काढावी, अशी मागणी केली. या विषयावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची तसेच जेष्ठ सदस्यांची समिती स्थापन करावी, अशी सूचना केली. या सूचनेवर समिती स्थापन करण्यासाठी सरकारची तयारी असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात सांगितले.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यातील जनता तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळेच सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन उपलब्ध बसेसच्या माध्यमातून मार्ग निश्चिती केले जातील, अशी ग्वाही परब यांनी विधान परिषदेत दिली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी मी सातत्याने चर्चा करत आहे. त्यामुळे निलंबन मागे घेण्यात येईल या आश्वासनाचा पुनरुच्चार परब यांनी केला. सदाभाऊ खोत यांनी सभागृहात मांडलेले पत्र हे खोट्या सहीचे आणि बनावट असल्याचा खुलासाही परब यांनी केला.