मुंबई - बोरिवली येथील निवासी भागाच्या मध्यभागी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, तसेच वीर जिजामाता उद्यान, निसर्ग उद्यान व कांदळवन याठिकाणी असलेले 'वाईल्ड लाईफ' हे 'मुंबई वाईल्ड लाईफ' या चित्रफितीच्या माध्यमातून जगासमोर आणणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुंबई महापालिका तयार करत असलेल्या 'वाईल्ड मुंबई' या फिल्मचा शुभारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील प्लाझा सिनेमागृहात पार पडला. यावेळी वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई 'वाईल्ड लाईफ' ही फिल्म अशी बनवा की, जगानं कौतुक केले पाहिजे, अशी सूचना देखील त्यांनी फिल्ममेकर अमोघ वर्षा यांना केली.
आपण निसर्गावर अत्याचार करूनसुद्धा मुंबईतील निसर्ग कशाप्रकारे जपतो हे त्या फिल्ममधून पुढे येणार आहे. मुंबईच हे वैभव जगासमोर आणूया, असे ठाकरे म्हणाले. मुंबईला निसर्गाचे सुंदर देणे लाभले आहे. मात्र, आपण सगळे ते देणं विसरून चटईक्षेत्राच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे आता आपापली चटई पसरा, असे सांगत निसर्ग जपण्याचे आवाहन त्यांनी केले.