मुंबई -कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम एक शस्त्र ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
या संवादात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. एन. रामस्वामी, ठाण्याचे मनपा आयुक्त बिपीन शर्मा यांच्यासह मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका, नगरपालिकातील लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात 15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाविरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यातील जनजीवन सुरळीत होत असतांना कोरोनाची साखळी तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी ही मोहीम महत्त्वाची असून लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी गाफील न राहता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचे आहे.