मुंबई- मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आज संपन्न झाले. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य याला चालना देणारे हे संशोधन केंद्र जागतिक पातळीवर अभिमान वाटेल अशा पद्धतीने उभे करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली. बाबासाहेबांनी सामाजिक, वैचारिक क्रांती केली. संविधान लिहिले. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे यासाठी लढा दिला. एकीकडे परकीयांशीही लढा दिला. दुसरीकडे समतेसाठी स्वकीयांशी लढा होता. पण यातही त्यांनी आपला ज्ञानप्राप्तीचा व्यासंग जतन केला. जगाला दिशा देणारा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात झाला ही खरोखर अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमात खासदार शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री शअजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. मृदुल निळे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे विचार दिशादर्शक
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, बाबासाहेबांना वाचनाचा आणि ज्ञानार्जनाचा प्रचंड व्यासंग होता. पण यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. ज्ञानार्जनासाठी त्यांच्या वाट्याला आलेल्या अडचणी, कष्ट यापुढे कोणत्याही व्यक्तिच्या, गोरगरीबांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी शासन कार्य करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रातूनही यासाठी निश्चितच दिशादर्शन होईल. हे संशोधन केंद्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीशी संलग्न असेल, तसेच ते कोलंबिया विद्यापीठाशी सुद्धा संलग्न झाले पाहीजे. बाबासाहेबांनी आपले ज्ञान स्वत:पुरते मर्यादीत न ठेवता देशाला त्याचा उपयोग करुन दिला. देशाला संविधान दिले. बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे विचार यापुढील काळातही सर्वांना दिशादर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.