मुंबई - भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिवाय त्यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.
ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपर्क केला. शिवाय या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे घटना
शनिवारी रात्री अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. कामावर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले गेले. मात्र तरीही धुर मोठ्या प्रमाणात होता.
७ बालकांना वाचवण्यात यश
या विभागामध्ये आऊट बोर्न आणि इन बोर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बोर्न मधील असलेले सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बोर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग लागली तेव्हा रूग्णालयात अन्य रूग्ण ही मोठ्या प्रमामात होते. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे ही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग नक्की कशामुळे लागली याबाबत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले
सरकार दु:खात सहभागी आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. धुर मोठ्या प्रमाणात होता. यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात जाता येत नव्हते. दुसऱ्या दरवाज्याने ते आत गेले. यामुळे लगतच्या वॉर्डात असलेल्या ७ बालकांना वाचवण्यात यश आले. या घटनेत १० बालकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही या प्रकरणाची निश्चित गंभीर दखल घेऊन, चौकशी करू. पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची देखील काळजी घेऊ. मी सद्या पुण्यात आहे. काही तासात घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं.