दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच वेगळी योजना - मुख्यमंत्री
या सरकारमध्ये भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले असले तरी आपण जनतेतून निवडून आलेलो असल्याने त्यांचे प्रश्न सोडविणे यावर भर देण्याच्या विचारांचे लोक आहेत. एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणास काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय, त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे.
मुंबई- एकीकडे ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे, असे असतानाच मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच दोन लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची योजना आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलते होते. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले अनुभवी नेत्यांचे हे मंत्रिमंडळ असून आपल्याकडे बेस्ट टीम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नव्याने शपथ घेतेले सर्व मंत्री व राज्यमंत्री यावेळी उपस्थित उपस्थित होते.