मुंबई - 'कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकूल असून कुणीही माझा वाढदिवस (Birthday) साजरा करू नये', असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केले आहे.
'सोशल मीडिया, मेलद्वारे द्या शुभेच्छा'
वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. तसेच फलक, पोस्टर्सही लावू नयेत. सोशल मीडिया (Social Media) व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू', असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
'कुठलेही जाहीर कार्यक्रम नको'
'राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत', अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
'वाढदिवसानिमित्ती CM फंडाला मदत द्या'
'पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (CM Fund) आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे', असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
27 जुलैला ठाकरेंचा वाढदिवस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस आहे. 1960 मध्ये त्यांचा मुंबईत जन्म झाला. वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदरच मुख्यमंत्र्यांनी आपल्या चाहत्यांना, कार्यकर्त्यांना हे विनंतीपर आवाहन केले आहे.
गेल्यावर्षीच्या शुभेच्छा कोविड योद्ध्यांना समर्पित
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीही वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. 'वाढदिवसाच्या निमित्तानं मिळणाऱ्या सर्व शुभेच्छा मी कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहे,' असं त्यांनी म्हटलं होतं.
मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा दुसरा वाढदिवस
येत्या २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा दुसरा वाढदिवस आहे. त्यामुळं आपल्या नेत्याचा हा वाढदिवस शिवसैनिकांसाठी निश्चितच मोठा आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक व हितचिंतकांची 'मातोश्री' निवासस्थानी रीघ लागते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी वेळीच या संदर्भात आवाहन केलं आहे.
अजित पवार, फडणवीसांचाही वाढदिवसही साधेपणाने
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही २२ जुलै रोजी वाढदिवस झाला. कोरोना आणि पूर परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी कोणत्याही सोहळ्याशिवाय हा वाढदिवस साधेपणाने साजरा केला. तसं आवाहनही त्यांनी आधीच केलं होतं. दरम्यान, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा -पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांकडून सर्व मदतीचे आश्वासन; चिपळूणमध्ये साधला पीडितांशी संवाद