मुंबई - पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात बंद झाल्याने याचा नाहक त्रास अनेक खातेधारकांना गेल्या ६ महिन्यांपासून होत आहे. यामुळे खातेधारक त्रस्त झाले असून रिझर्व बँकेने पैसे काढण्याची जी मर्यादा दिली आहे, ती खातेधारकांना पुरेशी नाही. पैशाअभावी खातेदारांना अनेक समस्या येत आहेत, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आज(रविवारी) पीएमसी खातेधारक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.
पीएमसी बँकेतील खातेधारक गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसलेले आहेत. मात्र, त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आज खातेधारक मुख्यमंत्री ठाकरे आणि आदित्य यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी मातोश्री परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून खातेधारक आंदोलन करत आहेत. परंतु, त्यांना गेल्या सरकारने त्यांना फक्त आश्वासनं दिली. मात्र, नवीन सरकारचे मुख्यमंत्री आणि आदित्य यांची आज भेट झाली. त्यांनी खातेदारांसाठी राज्य सरकार म्हणून जी मदत लागेल ती करू असे आश्वासन दिले. त्यामुळे दिलेले आश्वासन खरे ठरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी खातेधारकांना धीर देत सरकार म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करेन असे आश्वासन दिले.