मुंबई- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे 16 नोव्हेंबर, 2013 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.