मुंबई -सिरम इन्स्टिट्यूटच्या पुणे येथील नव्या इमारतीला आग लागली असली तरी यात कोविडच्या लसीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याने लस सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथी गृहात दिली.
हेही वाचा -एमपीएससी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेणार - अजित पवार
आग नियंत्रणात
कोविड 19 रोगावर प्रभावी लस बनवणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान आग लागली. आगीचे कारण सध्या समोर आले नसले तरी इलेक्ट्रिक काम सुरू असताना आग लागली असल्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली. आगीत अडकलेल्या 6 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे महानगर पालिकेच्या संपर्कात असून आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून सध्या आग नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.
आग लागण्याच्या कारणाचा शोध घेतला जाईल - मुख्यमंत्री
आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संगीतले. ज्या विभागात कोविड 19 आजारावर लस तयार करण्यात आली आहे त्या विभागाला आग लागली नसून, ही आग बीसीजी लस तयार करणाऱ्या विभागाला लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उशिरा मिळाली
मुख्यमंत्री ठाकरे सह्याद्री अतिथी गृहात पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच दुर्घटनाग्रस्त सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग नियंत्रणात येऊन कुलिंगचे काम सुरू होते. त्यावेळी अग्निशमन दलाकडून पाहणी सुरू असताना पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले.
मुख्यमंत्री सिरमच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची करणार पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली आहे. तिथल्या स्तिथीची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून उद्या (22 जानेवारी) दुपारी ते सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.
हेही वाचा -एनसीबीच्या कारवाईत 12 अमली पदार्थांसह 2 कोटी 80 लाखांची रोकड जप्त