मुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर शिंदे गटाच्या प्रवक्त्याचे मत मुंबईCM Shinde Resignation Discussion :एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले की, मागील काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (Ajit Pawar Group) आमच्या शिवसेनेतील मंत्री आणि मुख्यमंत्री राजीनामा देतील आणि आगामी काळात भाजपाच्या तिकिटावर निवडून येतील असंही बोललं जातंय. पण असे काही होणार नसून, विरोधक या अफवा पसरवताहेत. सध्या विरोधकांकडे कोणतेही काम नाही. त्यांच्याकडे अजेंडा नाही. म्हणून ते अशा अफवा पसरवत आहेत.
विरोधकांकडून वावड्या उठवण्याचे काम :सध्याचे सरकार हे विकासकामांना प्राधान्य देत आहे. अतिशय उत्तमरित्या हे सरकार काम करत आहे, हे विरोधकांना बघवत नाही. ते आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून ते अशा काही वावड्या उठवत आहेत, असा पलटवार (शिवसेना) शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी विरोधकांवर केला आहे. तसंच अजित पवार मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री बदलण्याचा सवालच नाही-भाजपा :सध्या महायुती म्हणजे भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे सरकारमध्ये चांगले काम करताहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची संपूर्ण टर्म पूर्ण करतील. सरकारचा कालावधी असेपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्री बदलण्याचा सवालच येत नाही, असं भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलं आहे. तसंच शिंदे गटाचा मूळ पक्ष हा शिवसेना आहे. त्यामुळं त्यांच्याकडे पक्ष आणि पक्षाचे चिन्ह असल्यामुळं त्यांचे आमदार त्यांच्याच पक्षातून निवडणूक लढवतील. आमच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असं देखील भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलय.
अजित पवार आगामी मुख्यमंत्री यात तथ्य नाही :सध्या महायुती सरकार उत्तम काम करत आहे; पण अजित पवार आगामी काळात मुख्यमंत्री व्हावे ही आमची तसेच जनतेची भावना आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगेल काम करताहेत. ते राजीनामा देतील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील ही फक्त अफवा आहे. पुढील सहा महिन्यांसाठी अजित पवार मुख्यमंत्री होतील, ह्या माध्यमात केवळ अफवा उठवल्या जाताहेत. असे काहीही होणार नाही. यात कुठेही तथ्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. मात्र अजित पवार 6 महिन्यांसाठी मुख्यमंत्री होतील अशी सध्या चर्चा असली तरी, भविष्यात असे चित्र दिसणार का? किंवा अजित पवार काही काळासाठी मुख्यमंत्री होणार का? शिंदे गटातील मंत्री राजीनामा देणार का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसातच मिळतील आणि चित्र स्पष्ट होईल यात शंका नाही.
हेही वाचा:
- फुग्याच्या सिलेंडरचा स्फोट,चिमुकल्याचा मृत्यू तर दोन जखमी
- तुमच्या दिव्याखालचा अंधार बघा, देव, देश आणि धर्माची चिंता सोडा; रामलल्लाच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंवर शिंदे गट-भाजपाकडून घणाघात
- फार्महाऊसवर दरोडा टाकून दागिन्यांसह ५५ सोयाबीनचे पोते लंपास, विरोध करणाऱ्या तरुणाच्या पोटात खुपसला चाकू