मुंबई : महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये रुपये 12 हजार 24 कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.
ऑडिट करण्याचा सूचना : कॅगने आपल्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव तसेच निधीचा निष्काळजीपणे वापर, ढिसाळ नियोजनावरुन ताशेरे मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर ओढले होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर 31 ऑक्टोबर 2022 ला शिवसेनेची 25 वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे ऑडिट करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या.
12 हजार कोटींची अनियमितता : मुंबई महापालिकेतील 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत म्हणजेच कोरोना काळात खर्च झालेल्या नऊ विभागांचे ऑडिट करण्यात आले आहे. साधारणपणे 12 हजार कोटी रुपयांचा गोंधळ झाल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. यामध्ये 3 हजार 500 कोटी रुपयांची कामे ही कोरोना संबंधित करण्यात आली होती. या कामांच्या आर्थिक व्यवहाराच्या ऑडिट कॅगला साथरोग अधिनियम कायद्याच्या तरतुदीनुसार करता येत नव्हते. त्यामुळे या कामाचे ऑडिट यामध्ये झाले नाही.
विशेष चौकशी समितीत : एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सहपोलीस आयुक्त आणि अन्य दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
हेही वाचा -समीर वानखेडे यांना 28 जून पर्यंत कारवाईपासून संरक्षण, शाहरुख खानला पक्षकार बनवण्याची मागणी