मुंबई - राज्यात वाढते सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारकडून नवे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. www.reportphishing.in या संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात झाले. या संकेतस्थळावरून ऑनलाईन फसवणूक आणि फिशिंगची माहिती सायबर पोलिसांना देता येणार आहे.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आर्थिक व्यवहार वाढले आहेत. सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा उच्च शिक्षित अधिकारी किंवा व्यापारी वर्ग सर्वच आर्थिक फसवणुकीचे शिकार आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे एसएमएस, मोबाईल ओटीपी, बनावट संकेतस्थळ, फोनवरून माहिती घेऊन ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहेत. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरचे अँटी फिशिंग युनिट कार्यरत आहे.
फिशिंग करणाऱ्या विविध साधनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यापासून कशा प्रकारे सावध व्हावे, यासंबंधी जनजागृती व्हावी तसेच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास त्याची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र सायबरच्यावतीने हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबरने नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या तांत्रिक सहकार्याने हे संकेतस्थळ निर्माण केले आहे.