मुंबई : विधानसभे पाठोपाठ उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत हादरा देण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्यानुसार आपले संख्याबळ वाढवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. विप्लव बाजोरीया यांना गळाला लावून शिंदेंनी ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. मात्र, शिंदेंना किमान दोन तृतीयांश सदस्य जमवावे लागणार आहेत. मात्र, बाजोरीया वगळता सर्व सदस्य ठाकरेंच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे शिंदे सेनेला बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
शिवसेनेत मोठी बंडखोरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेत मोठी फूट पडली. ४० आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे यांनी त्यानंतर विधानसभेत अधिक संख्याबळ असल्याचे सांगत पक्षावर दावा केला. पुढे शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. राज्यातील हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. पाच खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. दरम्यान, दोन्ही कडूनपक्ष आणि चिन्हावर दावा करु लागल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवला. दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र मागवून घेतले. अचानक आयोगाने निर्णय जाहीर करत गोठवलेले पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णया विरोधात ठाकरेसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दोन तृतीयांश सदस्य फोडावे लागणार :राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेत शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह १२ सदस्य आहेत. विप्लव बाजोरीया यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यानंतर बाजोरीया यांची परिषदेत प्रतोद पदी निवड करावी, असे स्वाक्षरी केलेले पत्र सभापतींकडे पाठवले आहे. बाजोरीया यांच्या पाठोपाठ ठाकरेंच्या सेनेला भगदाड पाडण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र, शिंदे सेनेला परिषदेतील दोन तृतीयांश सदस्य फोडावे लागणार आहे.
विधान परिषदेत ठाकरेंचा दबदबा :शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, सचिन अहिर, विलास पोतनीस, सुनील शिंदे, मनिषा कायंदे, नरेंद्र दराडे, आमशा पाडवी, विप्लव बाजोरीया हे विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आता दोन तृतीयांश म्हणजे १२ पैकी ८ सदस्यांचा आकडा शिंदेंना जमवावा लागणार आहे. परंतु अंबादास दानवे, अनिल परब, सचिन अहिर, विलास पोतनीस, सुनील शिंदे हे ठाकरेंचे विश्वसनीय मानले जातात. शिंदे गटाला ठाकरेंच्या सेनेला विधान परिषदेत सुरुंग लावताना, मोठी कसरत करावी लागणार आहे. मात्र, सध्या तरी विधान परिषदेत ठाकरे सेनेचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.