मुंबई Gram Panchayat Election Result: रविवारी राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचे मतदान झाले होते. त्याचा आज निकाल लागला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये काही नेत्यांच्या पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला. तर या ग्रामपंचायतीमध्ये महायुती म्हणजे शिंदे गट, भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांनी मिळून सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांनी बाजी मारली आहे. तर अनेकांना धक्का बसला आहे. कोकणात मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पॅनेलला आमदार आबिटकर यांनी धक्का देत विजय मिळवला आहे. दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निकालावर राजकीय पक्षाकडून प्रतिक्रिया येत असताना, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.
ज्यांनी मतदारांशी बेईमानी केली त्यांना घरी बसवलं : निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आम्हाला ज्या मतदारांनी कौल दिला आहे, मी त्या मतदारांचे मनापासून आभार मानतो. मागील एक वर्षापासून आम्ही केलेली कामं लोकांनी पाहिली. महाविकास आघाडीच्या काळात जी रखडवलेली कामं होती, त्यांना आम्ही चालना दिली आहे. शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं. खऱ्या अर्थाने सरकार आपल्या दारी पोहचलं आहे. मविआपेक्षा कितीतरी पटीनं महायुतीच्या जागा अधिक विजयी झाल्या आहेत. आमच्या सरकारमधील सर्वांनी लोकाभिमुख काम करण्याचं काम केलं. त्यामुळं हा मतदारांनी कौल दिला आहे. तसंच ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, त्या लोकांना मतदारांनी नाकारलं, घरी बसवलं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल -२०२३, ४ वाजेपर्यंतची आकडेवारी
भाजपा –665
शिंदे गट - 239
ठाकरे गट -108
काँग्रेस - 185
शरद पवार गट - 180