मुंबई:राज्यात येत्या पाच महिन्यांत लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांसाठी भाजपने महाराष्ट्रात 'मिशन ४८' ठेवले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. दरम्यान, भाजपने राज्यात २०१४ आणि २०१९ मध्ये ४२ जागा जिंकल्या होत्या. आता २०२४ च्या निवडणुकीत तेवढ्याच जागा जिंकू, तुम्ही निश्चित राहा, असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.
अमोल किर्तीकर उतरले रिंगणात: दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला शह देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणीवर भर दिला आहे. नुकतीच शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन धोरण आखले आहे. शिवसेना सोडलेल्या खासदारांविरोधात नवा उमेदवार देऊन, त्याला निवडून आणण्याची तयारी सुरु केली आहे. उत्तर मुंबई पश्चिम लोकसभा निवडणुकीत गजानन किर्तीकर यांच्या विरोधात अमोल किर्तीकर यांना रिंगणात उतरले जाणार आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या उमेदवारांची कोंडी करण्याची ठाकरेंची रणनिती आहे.
महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार:या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिंदे गटाच्या खासदारांची आज वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रचना ठरवली जाणार आहे. निवडणुकीसाठी विद्यमान खासदारांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे.