Mumbai News: मुंबईत 25 शस्त्रधारी घुसले असल्याची माहिती नागपूर पोलिसांना देणाऱ्यास अटक
नागपूर पोलिसांना 112 हेल्प लाईन क्रमांकावर काॅल करुन मुंबईत पंचवीस शास्त्रधारी घुसले आहेत. ते प्रतिष्ठित व्यक्तींच्या बंगल्यावर घातपात करणार आहे. अशी खोटी माहिती देऊन काॅल कट करणाऱ्या 20 वर्षीय दिव्यांग तरुणाला मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययु) अटक केली आहे.
मुंबईत 25 शस्त्रधारी घुसले
By
Published : Mar 5, 2023, 7:11 AM IST
मुंबई : पुण्यातील लोणीकंद येथून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याचा मोबाईल जप्त केला आहे. नागपूर पोलिसांना 112 या हेल्पलाईन क्रमांकावर 28 फेब्रुवारीला दुपारी पावणे चारच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन काॅल आला होता. काॅल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव राजेश कडके असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे तारक मेहता का उल्टा चश्मा फेम जेठालालची भूमिका करणारा दिलीप जोशी यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती.
बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली : 25 जणांकडे बंदुका आणि बाॅम्ब आहेत, अशी घटना त्याने फोनवर सांगितली होती. त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता धर्मेंद्र यांची निवासस्थानी बॉम्बस्फोट होणार आहेत, अशी माहिती देऊन कॉलरने काॅल कट केला. नागपूर पोलिसांनी लगेचच ही माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी या कॉलची तातडीने दखल घेतली होती.
काॅलधारकाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा : काॅलची दखल घेत मुंबई पोलिसांनी शिवाजी पोलीस ठाण्यासह तपास यंत्रणांना याचा अलर्ट दिला. दादरसह मध्य मुंबईत संशयित व्यक्ती, वस्तू आणि वाहनांची कसून तपासणी केली गेली. मात्र, पोलिसांना संशयास्पद असे काहीच सापडले नाही. अखेर पोलिसांनी याप्रकरणी राजेश कडके नाव सांगणाऱ्या काॅलधारकाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या अनुषंगाने सीआययुने तपास करून काॅल करणारा व्यक्ती पुण्यातील लोणीकंद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने पुण्यात जाऊन 20 वर्षीय दिव्यांग तरुणाला अटक केली आहे.
दादर परिसरातील शिवाजी पार्कमधील घटना : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञाताने कॉल केला होता. कॉल करून दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे देखील 25 शस्त्रधारी घुसले असल्याची माहिती त्यांनी दिली होती. हाच तोच कॉलर आहे, ज्याने मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घरांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. खऱ्या कॉलरची ओळख पटवण्यासाठी चौकशी शिवाजी पार्क पोलिसांकडून सुरू होती.