मुंबई:मुंबईचे माजी पोलीस आयुक्तपरमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास पोलिस करत आहेत. ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे. तसेच मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याची सीआयडीकडून चौकशी सुरु आहे.
मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 11 करत होते. याशिवाय परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसीबी खुली चौकशी करत होती. हे सर्व गुन्हे आता सीबीआयकडे वर्ग झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यावर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. आठवडाभराच्या कालावधीत परमबीर सिंह यांच्यावर दाखल असणाऱ्या सर्व गुन्ह्यांची कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला सोपवावीत असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
परमबीर यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल सात महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली येथील कार्यालयात त्यांची चौकशी झाली होती. डिसेंबर महिन्यात परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते.