महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा शून्यावर आणायचा आहे'

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधले. यावेळी त्यांनी विविध आवाहन केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Apr 8, 2020, 3:53 PM IST

मुंबई - कोरोनाग्रस्तांचा आकडा राज्यात वाढत असला तरी जनता माझ्यासोबत असल्याने चिंता आहे. पण, घाबरुन जाऊ नका. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा शून्यावर आणू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मंगळवारी (दि. 7 एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये कोरोना नियंत्रण संबंधात विविध धोरणात्मक निर्णय घेतले होते. आज मुख्यमंंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी विविध उपाय योजना बद्दल माहिती देता नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले.

आरोग्य यंत्रणा, पोलिसांचे आभार

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणा, पोलीस अहोरात्र काम करत आहेत. पण, प्रथमच सर्व विभागांना मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद देत आहे.

कोरोनामुळे मंत्र्यांनी अंतर पाळले मात्र मानसिकदृष्ट्या एकच

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जण मास्क लावून बसलेले छायाचित्र आपण पाहिले असेलच. ही पहिली अशी व्हिडिओ कॉन्फरन्स होती. सर्व मंत्र्यांनी एकमेकांत अंतर पाळले होते. मात्र, मानसिकदृष्ट्या आम्ही एक होतो आणि आहोत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एक टीम म्हणून त्यांनी बऱ्याच सूचना केल्या आहेत.

आपण कोरोनाच्या मागे हात धुवून लागलो आहोत

मला कल्पना आहे कोरोनाचा रुग्ण आपल्या राज्यात सापडून आता ४ आठवडे पूर्ण झाले. आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे. चिंतेची बाब असली तर घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत आहोत. आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको, असे मी सांगितले आहे. कोरोना आपल्यामागे लागला आहे. पण, आपण ही सर्व जण कोरोनाच्या मागे हात धुवून लागलो आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


आपले घरच गड, किल्ले
लॉकडाऊनमुळे आपली गैरसोय होत आहे. याबाबत दिलगिरी व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गड, किल्ले आहेत असे समजा. घरातले वातावरण आनंदी ठेवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

वाहिन्यांना केले आवाहन

मुख्यमंत्र्यांनी टीव्ही वाहिन्यांना देखील आवाहन केले. कोरोनाच्या बातम्या तर आहेतच पण नागरिक तणावमुक्त राहतील आणि वातावरण हलकेफुलके राहील असे कार्यक्रम दाखवा.

... यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे त्यानंतर युद्ध अर्थव्यवस्थेशी

ज्यांना ह्रदयविकार, मधुमेह, स्थूलपणा आहे त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. बंधने ठेवा, कारण हे सर्व हाय रिस्क ग्रुप मध्ये आहेत. योगासने, हलके फुलके व्यायाम करा. कारण हे युद्ध आपण जिंकणारच आहोत. पण, यानंतरचे युद्ध घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यासाठी आपली पूर्ण ताकद, हिम्मत लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

...तर आपल्याकडील परिस्थिती बदलेल

जगभरातील बातम्या येत आहेत. अमेरिका जपान, सिंगापूर येथील एकदा वाढत आहेत. पण, कालच बातमी आली की चीनच्या वूहानमध्ये निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. ही दिलासा देणारी बातमी आहे. त्यांना यासाठी ७०-७५ दिवस लागले. आपण जर असाच दक्षतेने सामना केला तर आपल्याकडे देखील ही परिस्थिती बदलेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

माणुसकी हा धर्म पाळत आहोत

मला खात्री आहे, आपण निश्चित बाहेर पडणार. जे गरीब आहेत, गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यात शिव भोजनाची सोय केली आहे. सोय केली आहे. निवारा केंद्रात ६ लाख लोकांना दिवसांतून दोन वेळेस जेवण, नाश्ता देत आहोत. माणुसकी हाच एक धर्म आहे जो आम्ही पळत आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आधारभूत किंमतीत धान्य मिळावे यासाठी पंतप्रधानांना विनंती

केशरी शिधापत्रिका धारक मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्यासाठी 3 किलो गहू 8 रुपये किलो दराने व 2 किलो तांदूळ 12 रुपये किलो दराने देण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांना यासंदर्भात किमान आधारभूत किंमतीत धान्य मिळावे, अशी विनंतीही केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राने जाहीर केलेल्या मोफत धान्याचे वाटपही सुरु झाले आहे. केंद्राचे चांगले सहकार्य मिळत आहे.

महाराष्ट्रात व्हेंटिलेटर बनविणे सुरु

मास्क, पीपीई किट्स चा तुटवडा जगभर आहे. आता आपल्या देशात महाराष्ट्र, गुजरातमध्ये व्हेंटिलेटर बनविणे सुरु आहे. पीपीई कीट सारख्या काही गोष्टी आपण बनवत आहोत. सर्व सुविधा वाढवतोय पण रोगाचे स्वरूप लक्षात घेता या सुविधा, उपकरणे प्रमाणित असणे गरजेचे आहे. हे लक्षात घ्यावे असे सांगितले.

आजपर्यंत 80 जण बरे हाऊन गेले घरी

आजपर्यंत 80 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 64 मृत्यू झाले आहेत. मुंबई-पुण्यात घरोघर चाचण्यांची संख्या वाढवतोय. जलद चाचणी, वैद्यकीय उपकरणे प्रमाणित करून घेत आहोत. चिंता आहे पण घाबरुन जाऊ नका. शून्यावर आकडा आणायचा आहे असे मुख्यमंत्र्यांनी शेवटी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details