मुंबई - सर्वसामान्य निर्दोष जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत असे वातावरण पोलिसांनी तयार करून जनतेला दिलासा मिळवून द्यावा. तसेच, पोलिसांचा वचक निर्माण करा. सागरी सुरक्षेबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून आदर्श, सुरक्षित व गतिमान अशी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाची ओळख निर्माण करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ई-उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना 'बरेच दिवसापासून आयुक्तालयाची मागणी होती. शहरांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब होती. या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. येथील स्थानिक जनतेच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण करतानाच पोलिसांबद्दलचा आदर निर्माण करा. वाईट कृत्य करतांना पोलिसांचे आपल्यावर लक्ष ठेऊन आहेत, ही भीती प्रत्येकाला वाटली पाहिजे. जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. गुंडागर्दीला आळा घालण्याबरोबरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करा. आपल्या कर्तव्यकठोर कामगिरीने आदर्श आयुक्तालय म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे,' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पोलिसांचे आरोग्यही महत्त्वाचे -
केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर, एक माणूस म्हणून पोलिसांकडे बघितले जावे. कोरोना काळात त्यांच्या आरोग्याची तसेच कुटुंबीयांची काळजी घेण्यात यावी, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त सदानंद म्हणून दातेंसारखा सक्षम व जिगरबाज अधिकारी देण्यात आला आहे. ते निश्चितच आदर्श कार्य करतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, की कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे पोलीस आयुक्तालय आवश्यक होते. येथे नेमणूक देताना स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. यामुळे त्यांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण होईल. मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांशी समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे. तसेच सागरी सुरक्षेला गांभीर्याने घेऊन काम करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. या आयुक्तालयासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.