महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Measles Disease : मुंबईत गोवर आजाराचा कहर; आठ जणांचा मृ्त्यू, परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई महानगरातील गोवरचा (Measles disease) प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीव जागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज प्रशासनाला दिले.

Chief Minister reviews the situation of measles outbreak in Mumbai
मुंबईत फोफावलेल्या गोवर आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

By

Published : Nov 17, 2022, 9:46 PM IST

Updated : Nov 17, 2022, 9:57 PM IST

मुंबई:मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. गोवरमुळे मुंबईत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन - लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहिम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीव जागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत १६४ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील ६१ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले. लसीकरणासाठी ९०० हून अधिक केंद्र सुरू करण्यात आले असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच बालकांना अ जीवनसत्वचा डोस देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत गोवरचा ८ वा मृत्यू - मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण १६९ रुग्णांची तर २६२३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवंडीमधील एका ६ महिन्याच्या मुलीचा भिवंडी ठाणे येथे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ झाला आहे. ३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

१०५ रुग्ण रुग्णालयात - एम इस्ट गोवंडी विभागात १ लाख ६१ हजार ७३७ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. मुंबईत २१ लाख ५१ हजार २४ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले २६२३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १६९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ० ते ८ महिन्याचे १४, ९ ते ११ महिने ७, १ ते ४ वर्ष ५२, ५ ते ९ वर्षे २१, १० ते १४ वर्षे ६, १५ आणि त्यावरील ५ असे एकूण १०५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवर २ रुग्ण आहेत तर ३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १२ हजार ८७० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत ८ संशयीत मृत्यू -२६ ऑक्टोबर पासून मुंबईत ७ मृत्यू झाले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात ४, राजावाडी २, आणि १ घरी मृत्यू झाला होता. गोवंडी येथील सकिना अन्सारी या ६ महिन्याच्या मुलीचा १३ नोव्हेंबरला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १७ नोव्हेंबरला तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलीला तीच्या पालकांनी भिवंडी ठाणे येथे नेले होते. त्यांनी याबाबतची माहिती दिली नव्हती. या मुलीच्या लसिकरणाबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. यामुळे मृतांची संख्या ८ झाली आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

Last Updated : Nov 17, 2022, 9:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details