मुंबई -गुरुवारीवडेट्टीवार यांनी अनलॉक संदर्भातील निर्णय जाहीर केला होता. मात्र, थोड्यात वेळाने मुख्यमंत्री कार्यालयातर्फे हा बदलवण्यात आला. यावरून राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. याला काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्यूत्तर दिले. 'राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. काही ठिकाणी परिस्थिती सुधारत असली, तरी याबाबत अजूनही सावधगिरी बाळगावी लागेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून वडेट्टीवार यांचा निर्णय बदलवल्या गेला असावा, कारण कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो', अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिली आहे.
'लॉकडाऊनबाबतच्या निर्णयाबाबत माहिती नाही' -
मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा नेहमीच अंतिम निर्णय असतो. कोणत्याही मंत्र्याच्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना दिला गेला आहे. त्यामुळे काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या निर्णय मुख्यमंत्र्याकडून बदलवण्यात आला, तो त्यांचा अधिकार आहे. तसेच लॉकडाऊनबाबत अजूनही काही चांगल्या गोष्टी केल्या जाऊ शकतात, असे मुख्यमंत्र्यांना वाटले असावे म्हणून विजय वडेट्टीवार यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलला असेल, असेही नाना पटोले म्हणाले. मात्र, सरकारने याबाबत काय निर्णय घेतला आहे, याबद्दल मला अद्याप माहिती नसून याबाबत माहिती घेतली जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
'आरक्षणामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव' -
छत्रपती संभाजीराजे आणि विनायक मेटे हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण मराठा आरक्षण हे कोणत्याही पक्षाचे नाही. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारदेखील गंभीर आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण केवळ केंद्र सरकार देऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर पावले उचलावी, असे नाना पटोले म्हणाले. तर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीस सरकारने समाजा-समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम केले आहे. सर्व समाजाला आरक्षणाची प्रलोभने दिली. त्यामुळे आज महाराष्ट्र आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये गुरफटला आहे, असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला. तसेच आताही राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आरक्षणाच्या मुद्द्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचेही ते म्हणाले.
'तत्कालीन फडणवीस सरकारने पदोन्नती आरक्षण रोखले' -
पदोन्नती आरक्षण रोखण्यासंदर्भातचा निर्णय तत्कालीन देवेंद्र फडणीस सरकारने 2017 मध्ये केला होता. त्यामुळेच आज पदोन्नती आरक्षणाबाबत विवाद सुरू आहे. पदोन्नती आरक्षणासंदर्भात काँग्रेस मंत्र्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच पदोन्नती आरक्षणाबाबत थेट काँग्रेसचा विरोध नसून, घटनात्मक रित्या मागासवर्गीय समाजाला जे आरक्षण आणि पदोन्नती आरक्षण दिले गेले आहे, ते मिळालेच पाहिजे, अशी काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - मुंबईच्या जोगेश्वरी ओशिवरा येथील आशियाना इमारतीला आग