मुंबई :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी बेबी आरिहा शाहच्या प्रकरणाकडे परराष्ट्रमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. आरिहा शाह गेल्या 20 महिन्यांपासून जर्मनीतील पाळणा गृहात अडकली आहे. भावेश, धारा शाह यांची मुलगी अरिहा शाह 7 महिन्यांची असताना तिला जर्मनीच्या बालसंगोपन संस्थेचे लोक घेऊन गेले आहेत. त्यानंतर 20 महिने उलटले, मात्र आजतागायत तीला परत आणण्यात आलेले नाही.
मुलीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत : ज्यांचे मुलांचे पालक एकतर या जगात नाहीत किंवा ते मुलाची काळजी घेण्यास असमर्थ आहेत, अशा मुलांना पालक गृहात ठेवले जाते. अरिहाचे आई-वडील तिला महिन्यातून एकदाच भेटतात. मिळालेल्या माहितीनुसार, अरिहा खेळत असताना तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली होती. यानंतर धारा आणि भावेश यांनी मुलगी अरिहाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. यानंतर जर्मन अधिकाऱ्यांनी मुलीला ताब्यात घेतले होते.
अरिहावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप : मुलीच्या पालकांनी सांगितले की, मुलीला किरकोळ अपघातात दुखापत झाली होती, त्यामुळे तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी अरिहाच्या पालकांचे काहीच ऐकले नाही. त्यांनी अरिहाला पाळणाघरात पाठवले. त्यानंतर अरिहाच्या पालकांनी हॉस्पिटल, पोलिसांच्या अहवालाने अरिहावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याची खात्री केली होती. परंतु तरीही अरिहाला बाल संगोपन संस्थेत ठेवण्यात आले आहे.
अरिहाला पाळणाघरात दोन वर्षे :मुलीचे पालक अरिहाची चांगली काळजी घेऊ शकत नाहीत, त्यामुळेच एवढी गंभीर दुखापत मुलीला झाली आहे, असे सांगून अरिहाला पालक गृहात ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून अरिहाचे आईवडील तिला परत मिळवण्यासाठी लढा देत आहेत. ऑगस्टमध्ये अरिहाला दोन वर्षे पाळणाघरात जाण्याला होणार आहेत. जर्मनीतील नियमांनुसार, एखादे मूल दोन वर्षे पाळणा गृहात राहिल्यानंतर त्याला त्याच्या पालकांकडे परत करता येत नाही.
प्रकरण न्यायालयात प्रलंबित :यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी डिसेंबरमध्ये त्यांच्या जर्मन समकक्ष ॲनालिना बियरबॉक यांच्यासमोरही अरिहाचा मुद्दा उपस्थित केला होता. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, मुलीने स्वतःच्या भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक वातावरणात जगले पाहिजे. प्रत्युत्तरादाखल जर्मनीचे परराष्ट्र मंत्री बेयरबॉक म्हणाले की, अरिहाचे आरोग्य त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.