मुंबई Eknath Shinde On Uddhav Thackeray : 'महास्वच्छता' अभियानांतर्गत आज (31 डिसेंबर) मुंबईत दहा ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 'डीप क्लीन मेगा ड्राईव्ह' आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून या अभियानाला सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे, फक्त मुंबईलाच स्वच्छ सुंदर करायचं नसून राज्यभरात हे अभियान राबवले जाणार असल्याचं म्हणाले. तसंच जे फक्त घरात बसून टीका करतात, त्यांनी फिल्डवर उतरून काम करणं गरजेचं आहे, असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे :यावेळी बोलतानामुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आज मुंबईत अनेक बांधकाम प्रोजेक्ट सुरू असून यादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडू नये, याकरता योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचे फुटपाथ कोणालाही दिसत नव्हते. कारण तिथे सर्व जंगल झालं होतं. परंतु आता त्या फुटपाथचं काम सुरू झालं असून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा वापर करता येईल. तसंच मुंबईत जिथे जागा मिळेल तिथे झाड लावण्याचे काम केले जाईल. यासंदर्भात पालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत" असंही त्यांनी सांगितलं.
सफाई कामगारांसाठी 5 लाखांचा विमा कवच : पुढे ते म्हणाले की, "पूर्वी 6 जूनला पाऊस पडायचा परंतु आता सर्व बदललंय. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. निसर्गचक्राचा समतोल राखण्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधांसह पर्यावरणावर लक्ष देणं गरजेचं आहे. शिवडी-न्हावाशेवा हा देशातील सर्वात मोठा ब्रिज आहे. त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे करत असताना काही प्राणी मित्रांनी आक्षेप घेतला. तेव्हा इथला एकही फ्लेमिंगो बाहेर जाणार नाही असं आश्वासन आम्ही त्यांना दिलं," असं त्यांनी सांगितलं. "सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो आहे. कारण तो नेहमी मुंबई स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं सफाई कामगारांचा बंद पडलेला 5 लाखाचा इन्शुरन्स सुरू करण्यात आलाय. तसंच सफाई कामगारांच्या मुलांना परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी योजना सुरू करण्यात आली" असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
तो ट्रॅक्टर नाही तर बीच कॉम्बर होता :यावेळी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "यापूर्वी 2014-15 साली पंतप्रधान मोदींनी 'स्वच्छ भारत अभियान' सुरू केले. त्यावेळी सुद्धा अनेकांनी टीका केली. जे टीका करतात त्यांच्यावर मी लक्ष देत नाही. कारण आपल्याला आपलं काम करायचंय. आम्ही जुहू चौपाटी येथे साफसफाईसाठी गेलो, तेव्हा काही लोक म्हणाले, त्या बीचवर मुख्यमंत्री ट्रॅक्टर चालवतात. अरे तो ट्रॅक्टर नव्हता, तर तो बीच कॉम्बर होता. म्हणून फिल्डवर उतरून काम करायचं असतं," असं ते म्हणाले.
हेही वाचा-
- मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची पुन्हा 'वर्षा'वर भेट, तर्क वितर्कांना उधाण
- फडणवीसांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'शिवसंकल्प'; लोकसभेसाठी 6 जानेवारीपासून करणार महाराष्ट्र दौरा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 'वंदे भारत ट्रेन'चं जल्लोषात स्वागत; म्हणाले, मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी