मुंबई- शिवाजी पार्कमध्ये मेळावा ( Dussehra gathering at Shivaji Park ) घेण्यासाठी लवकरच परवाणगी मिळतील, तुम्ही कामाला लागा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी दिले आहेत. बंडखोर शिंदे गटाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समोरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वास्तूत बैठक झाली. शिंदे यांनी या बैठकीत शिवाजी पार्कमध्चयेच मेळावा घेण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
कोण घेणार मेळावा यावर रंगले राजकारण : शिवसेनेचा दरवर्षी होणारा दसरा मेळावा कोण घेणार यावर राजकारण रंगले आहे. शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाने अर्ज केल्याने मुंबई महापालिकेने अर्जावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यावर ठाम असताना, आता बंडखोर शिंदे गट देखील शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर गटाची दसरा मेळावाबाबत मुंबईत बैठक झाली. यंदा दसरा मेळावा जोरात साजरा करायचा आहे. लवकरच परवाणगीही मिळेल, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडखोर गटाला दिले. तसेच एक वर्ष दसरा मेळाव्याची जबाबादारी माझ्याकडे होती. मैदानात मुंगीही शिरणार नाही, एवढी गर्दी मी जमवल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.