मुंबई:29 तारखेला रात्री दोन वाजताच्या सुमारास तिघेजण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शिवकर गावात कोंबड्या चोरीच्या उद्देशाने पोहोचले. सगळे गाव गाढ झोपेत असताना या तिघांनी संपूर्ण गावाची रेकी केली. हे तिघेजण घराच्या बाहेर जाळ्यात ठेवल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या शोधात गाव पालथे घालत होते. साधारण रात्री अडीचच्या सुमारास हे कोंबडी चोर विनय पाटील या तरुणाच्या घरासमोरून जात असताना त्यांना विनयच्या घराचा दरवाजा कडी न लावता पुढे केल्याचे लक्षात आले. कानोसा घेत या तिघांनी विनयच्या घरामध्ये डोकावले. घरातील वस्तूंवर चोरट्यांनी नजर पडली. त्यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. घरातील वस्तू चोरून त्या विकण्याचा त्यांचा डाव होता. त्याचवेळी विनयला अचानक जाग आली.
चोरांचा पाठलाग करणे बेतले जीवावर: आपल्या घरात चोरटे घुसल्याची खात्री पटताच विनयने ताडकन बिछ्यान्यावरून उठून हातात कुऱ्हाड घेतली. हे सगळे पाहताच चोरट्यांनी धूम ठोकली. विनय मात्र कुऱ्हाड घेऊन चोरट्यांचा पाठलाग करू लागला. रात्रीची वेळ होती. पाठलाग करता-करता आपण कधी गावाबाहेर आलो हे त्याला कळलेच नाही. गावापासून दूर जाताच चोरांनी विनयचा सामना केला. विनय आणि तिघे चोर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. चोर विनयवर भारी पडले. त्यांनी विनयवर हल्ला चढवला. विनय जखमी, बेशुद्धावस्थेत पडल्याचे कळताच या चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. हा सगळा प्रकार पहाटेपर्यंत सुरू होता.