महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे बदलणार; पुनर्विकासासाठी 9 कंपन्या  पात्र

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकांच्या हेरिटेज इमारत परिसराचा विमानतळाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसएमटीला जागतिक दर्जाचे 'मल्टिमॉडेल हब' बनवण्याचा प्रस्ताव भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) तयार केला आहे.

सीएसएमटी
सीएसएमटी

By

Published : Jun 2, 2021, 8:20 PM IST

मुंबई -मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकांच्या हेरिटेज इमारत परिसराचा विमानतळाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसएमटीला जागतिक दर्जाचे 'मल्टिमॉडेल हब' बनवण्याचा प्रस्ताव भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) तयार केला आहे. आता या हेरिटेज इमारतीचा पुनर्विकास केला जाणार असून यासाठी 9 कंपन्या पात्र ठरल्या आहेत. स्थानक आणि रेल्वे परिसराचा पुनर्विकास करण्यासाठी 1 हजार 642 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

1 हजार 642 कोटी रुपयांचा खर्च

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली ही इमारत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. गॉथिक शैलीतील ही इमारत जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या सीएसएमटी इमारतीला विमानतळाप्रमाणे सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आणि स्थानकाच्या पुनर्विकासाची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली होती. तसा प्रस्ताव भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) तयार केला आहे. या स्थानकाचे पुनर्विकास आणि आयकाॅनिक सिटी सेंटरमध्ये रुपांतरित करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समिती (पीपीपीएसी) यांच्या मान्यतेला मंजूरी मिळाली. त्यानुसार ऑगस्ट 2020 मध्ये खासगी कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले. तर, 15 जानेवारी, 2021 रोजी सीएसएमटीच्या पुनर्विकासाच्या कामाला एकूण 10 खासगी कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यापैकी 9 कंपन्या पात्र ठरल्या आहे.

पात्र ठरलेल्या कंपन्या

सीएसएमटीच्या पुनर्विकासाच्या कामासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांमध्ये मेसर्स गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, मेसर्स एकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स होल्डिंग्स लिमिटेड, मेसर्स ओबेरॉय रियल्टी लिमिटेड, मेसर्स आयएसक्यू आशिया इफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट लिमिटेड, मेसर्स कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड, मेसर्स जीएमआर इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स मोरीबस होल्डिंग्स पीटीई लिमिटेड आणि मेसर्स बीआयएफ-IV इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआईएफसी प्रायव्हेट यांच्या समावेश आहे.

60 वर्षांसाठी भाडेपट्टीवर

सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास काममध्ये रेल्वे परिसरात रेल मॉलही उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाचीही साधने असतील. ज्या कंपनीबरोबर यासंदर्भातील करार केला जाईल, त्या कंपनीला या रेल्वे स्थानकावरील उद्योगांसंदर्भातील देखरेख आणि इतर (कर्मर्शियल) कारभार 60 वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिला जाणार आहे.

हेरिटेज गॅलरी' उभारणार

सीएसएमटी वास्तूचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी ऐतिहासिक संकल्पनेवर आधारित पुनर्विकास केले जाणार आहे. सीएसएमटी येथे मेल-एक्‍स्प्रेस आणि लोकल यांच्यासाठी स्वतंत्र टर्मिनस होणार आहे. या स्थानकाला मुंबईच्या मध्यवर्ती रेल्वे मॉल प्रमाणे विकसित केले जाणार आहे. तसेच मुख्य इमारत व लगतच्या वारसा वास्तूंना धक्का न लावता अन्य इमारती स्थलांतरित करण्यात येणार आहेत. सीएसएमटीच्या मागील बाजूचा टॅक्‍सी स्टॅंड हलवण्यात येणार आहे. पादचाऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे "हेरिटेज गॅलरी' उभारण्याचा प्रस्ताव आहे.

काय मिळणार सुविधा ?

  • सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्या येणार आहे.
  • या गॅलरीत उभे राहून प्रवासी आणि पर्यटक ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकाचे सौंर्दय न्यायाळू शकता.
  • प्लटफॉर्म क्रमांक 18 मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे.
  • सुविधांसाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे.
  • स्थानकातील रेस्टॉरंट, खाद्यापदार्थ स्टॉल, प्रवासधनगृह व इतर सुविधा

असा होणार पुनर्विकास

  • पुनर्विकासानंतर रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार
  • रेल्वेची अ‍ॅनेक्स इमारत हटविण्यात येणार आहे.
  • डीआरएम कार्यालय व इतर कार्यालये भायखळ्याला स्थलांतरित होणार आहे.
  • टॅक्सी स्टॅण्डही काढण्यात येणार आहे.
  • पर्यटकांसाठी मोकळी जागा निर्माण करणार
  • मेल-एक्स्प्रेस आणि लोकल यांच्यासाठी स्वतंत्र टर्मिनस असणार
  • सध्याच्या हार्बरचा प्लटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 हा पी.डीमेलो रोडच्या दिशेला वळविण्यात येणार आहे.
  • मशीद बंदर स्थानकाच्या दिशेला लोकल आणि लांब पल्ल्याच्या मार्गिकांच्या यार्डचे नूतनीकरण करण्यात येईल.

हेही वाचा -ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 41 तालुक्यात 82 वसतिगृहे मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details