मुंबई :अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे काल अनावरण करण्यात आले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता.
शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव :यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस हा अतिशय भावनात्मक दिवस आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे उभारण्यात आला, याबद्दल मी मॉरिशसच्या पंतप्रधान, येथील मराठी समुदायाचा मनापासून आभारी आहे. तसेच आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच १२ कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. आम्ही अनेक राजे पाहिले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी, शौर्य, साहस हे अन्य कुणामध्ये नव्हते. म्हणूनच त्यांना 'श्रीमंत योगी' म्हटले जाते. जलसंवर्धन, समुद्री सामर्थ्य, किल्ले निर्मिती, प्रबंधन, अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील त्यांचे सामर्थ्य, चातुर्य हे सर्व आजही तितकेच मार्गदर्शक आहे. या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी ५ हजार कि.मी. दूर तुम्ही मला निमंत्रित केले हे भाग्य मला लाभले, असेही फडणवीस म्हणाले. महाराजांनी आपल्याला 'महाराष्ट्र धर्म' शिकविला. देव-देश आणि धर्मासाठी जगण्याची शपथ वयाच्या १४व्या वर्षी घेणारे आमचे हे आदर्श राजे आहेत. भारतीयांच्या मनामनात वीरतेचे बीजारोपण करण्याचे काम महाराजांनी केले असून मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो,असेही फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विविध घोषणांचे मॉरिशसच्या पंतप्रधानांनी यावेळी स्वागत केले. त्यांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करणारे मनोगत व्यक्त केले.