मुंबई - 'सारथी' संस्था वाचवण्यासाठी तसेच मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे आयुष्यात प्रथमच लाक्षणिक उपोषण करणार आहेत. काही दिवसापूर्वी मी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तत्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता. मात्र, अद्याप त्यासंदर्भात काहीच झाले नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेतली होती. सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
मनमानी विरोधात उपोषण हाच पर्याय
आज मला जाणीव झाली आहे की, लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दिनांक 11 जानेवारी 2020 ला पुणे येथे सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथीच्या लाभार्थ्यांसोबत उपोषणाला बसणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील तरुणांच्या सार्वांगीण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आता या संस्थेवर अस्तित्वाची टांगती तलवार आहे. संस्थेच्या कामकाजावर संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांनी शंका उपस्थित करून, संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, दैनंदिन कामकाज आणि कार्यालयीन कामकाजावर पैसे खर्च करण्यास बंदी आणली आहे. तसेच, संस्थेचा निधी देखील रोखून धरला आहे. त्यामुळे संभाजीराजे येत्या ११ जानेवारीला उपोषणाला बसणार आहेत.