मुंबई - शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शिवप्रेमींना खुशखबर दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांच्या संवर्धनाला सरकारने प्राधान्य दिले आहे. किल्ल्यांकडे जाणाऱ्या सुमारे ६०० किमीच्या ५२ रस्त्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी एकूण २१६.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातील ५२ रस्त्यांपैकी २१ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत दिली.
किल्ल्यांचे रस्ते होणार अधिक वेगवान, 600 किलोमीटरच्या रस्त्यांची कामे प्रगती पथावर
शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शिवप्रेमींना खुशखबर दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांच्या संवर्धनाला सरकारने प्राधान्य दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी शासनाकडून विविध कामे हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत किल्ल्यांकडे जाणाऱ्या ५२ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. त्यातील ५७६. ७८ किमीपैकी ४९७. ६८२ किमीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 216.68 कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहेत. ऊर्वरित रस्त्यांच्या कामे पुढील अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात येणार आहेत. यंदा मंजुरी देण्यात आलेल्या १७ रस्त्यांच्या कामे ही निविदास्तरावर अथवा कार्यादेश देण्याच्या स्तरावर आहेत. पन्हाळा गडाला जाणाऱ्या पन्हाळा वाघबीळ बोरपाडे-कोडोली वाठार रस्ता आणि विशाळगडाकडे जाणाऱ्या आंबा विशाळगड रस्ता या दोन मार्गांची १०.५० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. ऊर्वरित १२ रस्त्यांची कामे पुढील अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्याची अंदाजित किमत ही ९०.९ कोटी रुपये इतकी आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंजूर करण्यात आलेली बहुतांश कामे ही युद्धपातळीवर सुरु आहेत. या कामांमुळे गडकिल्ल्यांकडे जाणारे रस्ते अधिक वेगवान होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे राज्याच्या पर्यटनाला चालना मिळणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ठेवा जास्तीत जास्त नागरिकांना पाहण्यास व अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनाला अजून बळकटी मिळणार असून, लाखो शिवभक्तांना गडकोट किल्ल्यांना भेट देणे अधिक सोईचे होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत आणि त्यांची देखभाल दुरुस्तीही चांगली व्हावीत, यासाठी राज्य शासनाने हायब्रीड अॅन्युईटी प्रणाली अंमलात आणली आहे. या अंतर्गत राज्यातील ७६६. ३९ किमी रस्त्यांसाठी २ हजार १४२.९७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर झालेली बहुतांश कामे ही युद्धपातळीवर सुरु असल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी दिली. दरम्यान या सरकारने किल्ले संवर्धनाला प्राधान्य दिले असून गडकोट किल्यांकडे जाणारे रस्ते वेळेत पुर्ण केले जातील, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.