मुंबईChandrashekhar Bawankule News :तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र, मंत्री उदयननिधी स्टॅलिन यांनी चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया त्याचप्रमाणे डेंगूशी केली होती. ते म्हणाले होते की, सनातन धर्म, सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात असून काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवाव्याचं लागतात. जसे की डासांमुळे डेंगू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्याचा आपण विरोध करू शकत नाही. त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्म ही तसाच आहे, असं खळबळजनक वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
भारतीयांचा अपमान :ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेला स्पष्ट करावं की, उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन व हिंदू धर्माबाबत जे वक्तव्य करून 140 कोटी भारतीयांचा अपमान केला आहे. त्या उदयनिधी बरोबर उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीमध्ये युती केली आहे. उद्धव ठाकरे यांना उदयनिधी यांनी केलेलं हे वक्तव्य मान्य आहे का? जर त्यांना ते मान्य असेल तर त्यांनी ते सांगावं, मान्य नसेल तर त्यांनी इंडीया आघाडीमधून बाहेर पडायला पाहिजे, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिलाय.
कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न : पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे सध्या नको त्या विषयावर भाष्य करत आहेत. राम मंदिर उद्घाटनाप्रसंगी तिथे गोध्रा हत्याकांड होईल. त्याचप्रमाणे दंगली होतील. हे त्यांचं वक्तव्य म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीची वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतांचं राजकारण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश अतिशय पुढे गेलाय. देशात, महाराष्ट्रात दंगली घडविण्याची कोणाच्यात हिम्मत नाहीय. उद्धव ठाकरे यांना जर का दंगली घडतील, असे वाटत असेल तर त्यांनी सरकारला त्याची माहिती द्यायला पाहिजे. राजकारणासाठी व स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी जर ते अशी बेजबाबदार विधाने करत असतील तर हे त्यांना शोभत नाही, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावलाय.