अहमदनगर- राज्यभरात मंदिरे खुली करण्याची मागणी करत भाजपातर्फे आज (मंगळवारी) सर्वत्र आंदोलने करण्यात आले. याच मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. तर, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिले आहे. या वादात आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्हाला खरंच हिंदुत्व शिकवण्याची गरज आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्राचा निषेध राज्यातील प्रमुख देवस्थाने खुली करण्यासाठी भाजप पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले तसेच साधुसंतानी आज शिर्डी नगरपंचायत जवळ लक्षणीक उपोषण केले होते. या आंदोलनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या प्रश्नावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी एकमेकांना पत्र लिहिली आहेत. तर, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपाने उपोषण सुरू केले आहे. अशात आता हिंदुत्वाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिले आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्राचा निषेध व्यक्त करत जोरदार टीका केली. तसेच, उद्दामपणाने उत्तर द्यायचे होते, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना सांगायचे होते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
अयोध्या मंदिर भूमीपूजनाच्या कार्यकमाला न जाण्यावरुनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तुम्ही अयोध्याला गेले का गेले नाही? कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसने पाठींबा काढण्याची धमकी दिली होती का? असा सवालही त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, उध्दव ठाकरे तुम्हाला खरेच हिंदुत्व शिकविण्याची गरज आहे. राज्यपाल हिंदू नागरिक असून राज्याचे ते प्रथम नागरिक आहेत. त्यांना पत्र लिहीताना तुम्ही उद्दामपणा दाखवला, पत्र लिहिताना भाषेच्या मर्यादेचा जरा विचार करायला हवा, असे ते म्हणाले. तर, सर्वात मोठा धर्म हिंदू असून सर्वधर्म समभाव ही सेक्युलरची व्याख्या आहे, मग मंदिर उघडणे हा कायद्याचा भंग कसा होईल, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.