मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे.
१०० कोटी वसूलीचा आरोप -
चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातील अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. सचिन वाझे याला २००४ मध्ये निलंबित करण्यात आले होते. मात्र, २०२०मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतले, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसेच उत्पादकांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितले, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.