मुंबई- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी विधानसभेत भ्रष्टाचाराचे आरोप केले. पुरवणी मागण्यांवर बोलताना नियमबाह्य आरोप केल्याने गरज पडल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात महसूल मंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात राज्य सरकारचा शेकडो कोटी रुपयांचा महसूल बुडल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जयंत पाटील यांनी कोणतीही नोटीस दिली नाही. त्यामुळे पाटील यांनी केलेले आरोप सभागृहच्या पटलावरन काढून टाकण्याची मागणी संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार पाटील यांनी केलेले आरोप पटलावरून काढवून टाकण्यात आले. मात्र, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा आरोप केले.