मुंबई - डोक्यावर निळी टोपी, हातात झेंडा, काखेला पिशवी अडकवून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या काना-कोपऱ्यातून हा जनसमुदाय येथे आला आहे.
चैत्यभूमीवर लोटला लाखोंचा जनसागर
बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अबालवृद्धांनी रांगा लावल्या आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. मुंबई महानगरपालिकेकडून उत्तमरित्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात लावलेल्या नेत्यांच्या बॅनरमुळे अनेक अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - बाबासाहेबांचे मुंबईमधील घर राष्ट्रीय स्मारक करणार - मुख्यमंत्री
महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमानिमित्त दादर रेल्वे स्थानकापासून शिवाजीपार्क-चैत्यभूमीपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चैत्यभूमी आणि शिवाजीपार्क परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील साहित्यांनी आणि छायाचित्रांनी स्टॉल सजले आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून येथे मुक्कामाला असलेल्या नागरिकांसाठी विविध सामाजिक संस्था, संघटना, बँका, लोकप्रतिनिधींनी अल्पोहार आणि जेवणाची व्यवस्था केली आली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याठिकाणी पोलीस कर्मचारी आणि समता सैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. त्यामुळे रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे.