मुंबई- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काही वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये जे पाकिस्तानमधून आलेले अल्पसंख्याक आहेत, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहले होते. 2003 मध्ये मनमोहन सिंग यांनी तेव्हा सांगितले होते, जे भारतात अल्पसंख्याक आले आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व द्यावे. मात्र, आता हेच काँग्रेस या कायद्याला विरोध करत आहेत. आम्ही मानवतावादी दृष्टिकोनातून हा कायदा तयार केला आहे. मात्र काँग्रेस याचे राजकारण करत आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केला आहे.
हेही वाचा -CAA protest - जामिया विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचे रस्त्यांवर चित्रे काढून आंदोलन
सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. एकीकडे देशात या कायद्याला विरोध होत असताना भाजप या कायद्याच्या समर्थनात लोकांसमोर उतरणार आहे. आज चर्चगेट येथे हा कायद्याबाबत लोकांमध्ये असणारा गैरसमज दूर व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री गोयल मुंबईत आले होते. यावेळी ते बोलत होते. भाजपतर्फे लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये 23 टक्के हिंदू, शीख, बौद्ध यांची लोकसंख्या होती. मात्र, आता खूप कमी अल्पसंख्याक तिथे आहेत. अनेकांवर अत्याचार करण्यात आला. भितीपोटी ही लोक तिथेच राहिली. मात्र, या सर्वांना चांगले आयुष्य देण्यासाठी आम्ही हा निर्णय आणला असल्याचे गोयल यांनी सांगितले.