मुंबई- कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, तो अद्याप केलेलाच नाही. परंतु, सप्टेंबर अखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत ते तरी त्यांनी आधी द्यावेत, अशी मागणी महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
थोरात पुढे म्हणाले की, राज्य सरकारला पगार आणि इतर दैनंदिन खर्चासाठी लागणारा ५५ हजार कोटी रुपयांचा निधी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून उभारला आहे. कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू असून परिस्थिती बदलल्यानंतर चित्र बदलेल. परंतु, सद्यस्थितीत कर्ज काढावे लागत आहे. महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते. परंतु, राज्याला मात्र मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो, असा आरोपही त्यांनी केला.