मुंबई -कोरोनाच्या चाचण्यांची सुविधा वाढवणार आहे. तसेच चाचणी झाल्यानंतर अहवाल लवकरात लवकर प्राप्त व्हावा, यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे तसेच पूल टेस्टींगची परवानगी केंद्र सरकारला मागितली आहे. त्यामुळे चाचण्या करण्याचा वेग वाढेल. केंद्राकडे साडेतीन लाख पीपीई किट मागवले. मात्र, फक्त तीस हजार किट आल्या. त्यामुळे केंद्र सरकारने वेगाने मदत करावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
देशातील एकूण चाचण्यांपैकी राज्यात २० टक्के चाचण्या करण्यात आल्या. ५१ हजार चाचण्या झाल्या. यापैकी ५० टक्के मुंबईमध्ये झाल्या आहेत. चाचण्याच्या तुलनेमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण फक्त ४ टक्के आहे. तसेच प्लाझमा थेरपीची परवानगी आयसीएमआर आणि केंद्र सरकारला मागितली आहे. बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातून प्लाझ्मा काढून कोरोनाबाधितांना दिला तर रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनावर मात करू शकतो, असे राजेश टोपे म्हणाले.