मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला तीन मंत्रिपद मिळणार आहेत. परंतु त्यामध्ये किती कॅबिनेट मंत्रीपद असणार की तिन्ही राज्यमंत्रीपद असणार याबाबत अजूनही थोडासा संभ्रम आहे. परंतु ही तीन नावे कोणती असतील ? याबाबत सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना असून त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
३ मंत्रीपदावर शिक्कामोर्तब :महाराष्ट्रात नाट्यमय सत्तांतरानंतर झालेल्या सत्ता स्थापनेत स्वतः एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी विराजमान करून भाजपने अनेक मंत्रीपद सुद्धा त्यांच्या गटाला दिली. त्याचबरोबर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) १८ पैकी १३ खासदार हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. परंतु केंद्रीय नेतृत्वामध्ये त्यांना संधी देण्यात आली नव्हती. ती संधी आता चालून आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्री पद मिळणार असल्याचे जवळपास नक्की झाले असून एकनाथ शिंदे यांनी यासाठी दोन कॅबिनेट मंत्री व एक राज्य मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे. परंतु त्याऐवजी त्यांना ३ राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास नक्की मानले जात आहे.
शिंदेंचा करिश्मा कायम :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेचे १३ खासदारही शिंदे गटात सामील झाले. शिंदे यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांच्या जोरावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले. त्याच्यापुढे जाऊन शिंदे यांनी लोकसभेतील शिवसेनेचे १३ खासदार आपल्यासोबत आणल्याने भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्याहूनही शिंदेंवर अधिक खुश झाले आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अनेकदा चर्चेचे प्रसंग आले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केल्याची चर्चा आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडवणीस हे निभावत असून त्यांनी सुद्धा येणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिंदे गटाला योग्य तो सन्मान दिला जाणार असल्याचेही सांगितले आहे. त्या कारणास्तव आता शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात ३ मंत्री पद मिळणार हे जवळपास नक्की मानले जात आहे.