मुंबई- कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सोबतच प्रदेश काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सार्वजनिक कार्यक्रम दरवर्षी होत असते, ते रद्द करत असल्याची घोषणा करून त्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वाचन करून त्यांना अभिवादन करुया, असे आवाहन महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.
कोरोना विरोधातील लढाई निर्णायक वळणावर आली आहे. आतापर्यंत नागरिकांनी जी एकजूटता आणि जिद्द दाखविली ती कौतुकास्पद आहे. मात्र, आता कसोटीचा काळ सुरू झाला आहे. गुढी पाडवा, राम नवमी, पंढरपूरची वारी आपण सर्वांनी घरात राहूनच साजरी केली. असेच सामाजिक भान यापुढेही ठेऊन कोणत्याही जातीचे, धर्माचे विचार करून सण उत्सव साजरे करण्यासाठी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. येणारी महावीर जयंती, हनुमान जयंती, शब्ब-ए-बारात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे न करण्याचे आवाहन मी राज्यातील जनतेला करतो, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.