मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली नाशिक पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी सोमवारी केला. राऊत यांनी एका ट्विटर पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, महाराष्ट्रात लोकशाही आणि स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम झाला असून अशा हुकूमशाही विरुद्ध लढा द्यावा लागणार आहे.
सत्तासंघर्षावरील निकालानंतर चिथावणीखोर वक्तव्य केले होते : नाशिक पोलिसांनी राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरुद्ध राज्य अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर राज्य सरकारच्या आदेशाचे पालन न करण्याचे आवाहन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर 12 मे रोजी राऊत यांनी ही टिप्पणी केली होती. या टिप्पणीची नाशिक पोलिसांनी स्वतःहून दखल घेतली आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 505 (1) (बी), पोलिस (असंतोषाला भडकावणे) कायदा आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
'मला कोणत्याही कारवाईची भीती वाटत नाही' : संजय राऊत यांनी ट्विट केले की, 'मी माझे मत व्यक्त केले होते की राज्य प्रशासनाने या सरकारच्या आदेशाचे पालन करू नये, कारण त्यांना भविष्यात कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. हा काय गुन्हा आहे का? राज्य सरकारने थेट माझ्यावरच गुन्हा दाखल केला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा दाखला देत राऊत यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये दावा केला आहे की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकार स्थापनेची प्रक्रिया आता बेकायदेशीर बनली आहे. मुख्य व्हीप आणि शिंदे यांची विधानसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती आता घटनाबाह्य ठरली आहे. परिस्थिती अशी आहे की 16 आमदार कधीही अपात्र ठरू शकतात. मात्र, मला माझ्यावरील कोणत्याही कारवाईची भीती वाटत नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा :
- Aryan Khan Drug Case : समीर वानखेडेने शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली होती, सीबीआयच्या आरोपपत्रात खुलासा
- FIR On Sanjay Raut : नाशिकमधील 'ते' वक्तव्य संजय राऊतांना भोवले, गुन्हा दाखल
- ED Summons Jayant Patil: ईडीने बजावले जयंत पाटील यांना दुसरे समन्स; 29 मे रोजी होणार चौकशी