बुलडाणा -देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणार्या वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देणार्या राज्यातील सैनिकांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पुरवणी मागणीत बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील सैनिकांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली होती. पुरवणी मागण्यावर चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. त्यामुळे राज्यातील 2 लाख 44 हजार सैनिकांना मालमत्ता करामध्ये दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा...CORONA : गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल - आरोग्य मंत्री राजेश टोपे
कुटुंबापासून शेकडो मैल दूर राहून सीमेवर रात्रंदिवस शत्रूंसोबत दोन हात करणार्या आपल्या बहादूर जवानांच्या कुटुंबीयांना कमी पगारात परिवाराचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात शासनाचे विविध कर भरावे लागतात. त्यामुळे थोडासा दिलासा म्हणून सैनिकांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी बुलडाण्याच्या नगराध्यक्षा असताना पुजा संजय गायकवाड यांनी केली होती. शहरातील अनेक माजी सैनिकांनी सैनिकांच्या कुटुंबाचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी त्यावेळी केली होती. मात्र, नगरपरिषदेच्या कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतुद नसल्यामुळे हा मुद्दा मागे पडला होता.