मुंबई - राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक वर्षा बंगल्यावर होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ उपसमितीमधील इतर मंत्री आणि सचिव देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या बैठकीला पाठ फिरवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. बैठकीला भाजपचे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अनिल बोंडे, सुभाष देशमुख, सुरेश खाडे यांच्यासोबत शिवसेनेचे माजी जलसंवर्धन राज्यमंत्री विजय शिवतारे आदी या बैठकीला उपस्थित आहेत. तसेच मित्र पक्षाचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर, अविनाश महातेकर हे देखील उपस्थित आहेत. तर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये समावेश नसताना देखील महादेव जानकर रामदास आठवले उपस्थित असल्याने इतर राजकीय मुद्द्यांवर देखील अनोपचारिक चर्चा होण्याची शक्यता आहे.