मुंबई :रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना, ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून या मंत्रिमंडळात भाजप त्याच बरोबर शिंदे गटातील कोणत्या आमदारांना संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप व शिंदे गटातील तसेच अपक्ष असे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर विस्तार :मागील ११ महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले जात होते. मात्र हा तिढा अखेर विधानसभा अध्यक्षांकडे आल्यानंतर त्यावर अद्याप निर्णय बाकी आहे. म्हणूनच या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात असून हा निर्णय लवकरच घेतला जाईल असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी ७ - ७ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
असा होईल विस्तार :मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी, धनगर, मराठा आणि मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांना स्थान दिले जाणार आहे. तसेच, संघटनात्मक गणित पाहून मंत्रिमंडळात समावेश केला जाईल असे म्हटले जात आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई अशा प्रत्येक जिल्ह्याला संधी देऊन प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न शिंदे - फडणवीस सरकारकडून करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे अनेक नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी यापूर्वीच रस्सीखेच सुरू झाली असून अनेकांनी लॉबिंग सुद्धा लावली आहे.